मुंबई । कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका घेतल्याचा आरोपाखाली न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. मात्र त्यानंतर कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना नाशिकच्या सत्र न्यायालयाने काही महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.नाशिक न्यायालयाच्या निरीक्षणानंतर विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर हल्लाबोल केला आहे. उद्या एखाद्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयाने खर्चाची भूमिका घेतली तर खुनातील आरोपी मोकाट फिरू शकतो, असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.
माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली असती तर ते अपात्र झाले असते. अपात्र झाले असते तर पोटनिवडणुक घ्यावी लागली असती, आणि जनतेचा पैसा खर्च झाला असता. खर्च टाळण्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला ट्रायल कोर्टाने स्थगिती दिली. न्यायालयाने नमूद केले की, शिक्षा स्थगित करण्यासाठी गुन्ह्याचे स्वरूप, त्याचे गांभीर्य आणि व्यापक सामाजिक परिणाम विचारात घेणे आवश्यक आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात शिक्षा सुनावण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचा उल्लेखही सत्र न्यायाधीशांनी केला.
नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार ?
“निवडणुकीचा खर्च वाढणार आहे, म्हणून आम्ही माफ करतो न्यायालयाची अशी भूमिका हास्यास्पद आहे. न्यायालय असं वागणार असेल तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी? उद्या एखाद्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयाने खर्चाची भूमिका घेतली तर खुनातील आरोपी मोकाट फिरू शकतो. गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. तो लोकप्रतिनिधी असो वा नसो सर्वांना एकसमान न्याय दिला पाहिजे,” असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
Discussion about this post