जळगाव – महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ‘दक्षता जनजागृती सप्ताह २०२५’ (Vigilance Awareness Week) २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर साजरा होत आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये आणि शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जबाबदारी याविषयी जनजागृती निर्माण करणे हा आहे. यावर्षीच्या सप्ताहाची थीम “राष्ट्राच्या समृद्धीसाठी प्रामाणिकतेची संस्कृती” (Culture of Integrity for Nation’s Prosperity) अशी आहे.
जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात आज सकाळी ११ वाजता विभागीय. कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षता प्रतिज्ञा घेऊन सप्ताहाची सुरुवात केली. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या संदेशाचे वाचन करून उपक्रमाची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सप्ताहादरम्यान विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, निबंध लेखन, शपथविधी कार्यक्रम, रॅली, बॅनर लावणे यांचा समावेश आहे. तसेच नागरिकांपर्यंत प्रामाणिकतेचा संदेश पोहोचविण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये बॅनर, फलक, तसेच सोशल मीडियाद्वारेही जनजागृती केली जाणार आहे.
प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जनजागृती वाढविण्यासाठी विविध वृत्तपत्रांमध्ये लेख, बातम्या, आणि माहितीपर नोटीस प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. नागरिकांकडून शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध लाच मागणीसंबंधी माहिती मिळाल्यास ती त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जनतेसाठी विभागाने तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक, लँडलाईन तसेच ई-मेल सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
टोल फ्री क्रमांक: १०६४
लँडलाईन क्रमांक: ०२५७-२२१५७६७
ई-मेल: dyspacbjalggaon@gmail.com
वेबसाईट: www.acbmaharashtra.gov.in
हा उपक्रम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव कार्यालयाच्या वतीने पोलिस उप अधीक्षक योगेश जी. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी हातभार लावावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.















Discussion about this post