जळगाव । सकाळी प्रचंड जल्लोषात निघालेली छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक, तुडुंब भरलेल्या सिनेट सभागृहात शिवरायांच्या कर्तृत्वाला उजाळा देणारे पोवाडे, शौर्य गीत, नृत्य, पाळणागीत, नाट्य आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण आणि गड किल्ल्यांचे महत्व अधेारेखित करणारे व्याख्यान या भरगच्च कार्यक्रमांमुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिवजयंती यावेळी अविस्मरणीय ठरली.
विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेअंतर्गत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राच्यावतीने शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशव्दारापासून शिव प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत मावळयांचा वेष, फेटे परिधान करुन विद्यार्थी तर काही नऊवारी साडया घालून विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. शिवरायांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत विद्यार्थी सचिन पाटील, जिजाऊंच्या वेशभुषेत विद्यार्थिनी निर्जला साळवे तर बाल संभाजींच्या वेशभुषेत विहान साळवे हे होते. लेझिम, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक मुख्य प्रशासकीय इमारतीजवळ आली.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. यामध्ये विद्यार्थ्यांव्दारे शिवरायांच्या कर्तृत्वाची गाथा विविध कला प्रकाराव्दारे सादर करण्यात आली. प्रारंभी प्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी समुह नृत्य सादर केले. ऋषिकेश बारी, अनुराग जगदाळे यांनी वैयक्तिक गीते सादर केली. माधुरी महाजन हिने काव्य वाचन तर सुकन्या जाधव हिने गीत गायन केले. कला व मानव्यविद्या प्रशाळेतील विद्यार्थ्यांच्या संघाने पारंपरिक आख्यान सादर केले. यावेळी कोंढाणा किल्ला सर करण्याच्या प्रसंगावर आधारित नाटिकेचे विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण केले. या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन मेघना देसले, साक्षी पाटील, हर्षदा मानकरे व डॉ. विजय घोरपडे यांनी केले.
देवदत्त गोखले यांचा गडकिल्ल्यांचा अभ्यास या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी आपल्या भाषणात शिवकालीन विविध गडकिल्ल्यांची माहिती देत त्यांची रचना व शत्रूंचा विमोड होण्यासाठी केलेली वैविध्यपूर्ण रचना यांची माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी शिवरायांच्या व्यक्तिमत्वातून राष्ट्रभक्ती, महिला सन्मान, योग्य रणनिती, कुशल प्रशासन आणि आत्मविश्वास हे गुण विद्यार्थ्यांनी घ्यावे असे आवाहन केले. प्रारंभी केंद्राचे प्रभारी संचालक प्रा.अजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.म.सु.पगारे, पी.ई.तात्या पाटील, वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील, अधिसभा सदस्य सुरेखा पाटील आदी उपस्थित होते.
Discussion about this post