जळगाव । जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू माफियांचा धुमाकूळ सुरूच असून यातच भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरच्या धडकेत अनेकांना जीवावर मुकावे लागले आहे. अशातच भरधाव वाळूच्या डंपरने धडक दिल्याने कार तापी नदीत कोसळून माय-लेक ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव-चोपडा मार्गावरील विदगाव जवळील तापी नदीच्या पुलावर घडली. मीनाक्षी नीलेश चौधरी (रा. विठ्ठल नगर) व त्यांचा मुलगा पार्थ (१२) असं मृतांची नाव आहे तर नीलेश प्रभाकर चौधरी (वय ३६) व लहान मुलगा ध्रुव (वय ४) असं जखमी झालेल्यांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील विठ्ठलवाडी परिसरात राहणारे निलेश प्रभाकर चौधरी वय-४५ हे धानोरा येथील शाळेत शिक्षक असून पत्नी मीनाक्षी वय-४० या जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील पाटणकर शाळेत शिक्षिका आहेत. दोघे मुलगा पार्थ वय-१२ आणि ध्रुव वय-६ यांच्यासह चारचाकी कार क्रमांक एमएच.१९.डीव्ही.८०३२ ने चोपडा येथे नातेवाईकाकडे अष्टमीच्या पूजेसाठी गेले होते.
रात्रीच्या सुमारास जळगावकडे परतत असताना जळगावहून भरधाव वेगाने चोपड्याकडे जाणाऱ्या वाळूच्या भरलेल्या डंपरने समोरून त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की चारचाकी पुलाचा कठडा तोडून खाली नदीच्या काठावर खडकाळ भागात कोसळली. डंपरची पुढील दोन्ही चाके निखळली तर डंपर पुलावर आडवा होऊन सर्व वाळू पसरली. यामुळे तापी पुलावर वाहतूक विस्कळीत झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस स्थानकाचे निरिक्षक संजय गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.















Discussion about this post