जळगाव । ट्रान्सजेंडर व्यक्तींबद्दल समाजात संवेदनशिलता अधिक वाढीला लागण्याची गरज असून शासकीय पातळीवर या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असले तरी समाजाला आणि त्यासोबतच माध्यमांना पुढाकार घ्यावा लागणार आहे असे प्रतिपादन कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळा आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टीस अॅण्ड एम्पावरमेंट, नवीदिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. २३ सप्टेंबर रोजी ‘ट्रान्सजेंडर आणि माध्यमांची भूमिका’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याकार्यशाळेचे उद्घाटन करतांना कुलगुरू प्रा. माहेश्वरी बोलत होते. यावेळी दै. लोकमतचे संपादक किरण अग्रवाल, दै. दिव्य मराठीचे संपादक दीपक पटवे, दै. देशदूतचे संपादक हेमंत अलोने, दै. देशोन्नतीचे आवृत्ती प्रमुख मनोज बारी यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
प्रा. माहेश्वरी म्हणाले की, अनुवंशिक, जैविक अथवा हार्मोनिक कारणांमुळे एखाद्या व्यक्तीला ट्रान्सजेंडर समजले जाते. या व्यक्तींना समाजात चांगली वागणून मिळत नसल्यामुळे व रोजगाराची साधने उपलब्ध होत नसल्यामुळे अप्रिय कामात सहभाग घ्यावा लागतो. सुसंस्कृत समाजाची पहिली अट सर्व घटकांना समान संधी ही असली पाहिजे. त्यादृष्टीकोनातून ट्रान्सजेंडर व्यक्तींबद्दल समाजात संवेदनशीलता अधिक प्रमाणात वाढवावी लागेल. काही कायदे करून सरकार प्रयत्न करीत आहे मात्र समाजातही हा बदल घडायला हवा यामध्ये माध्यमांचा पुढाकार अधिक हवा असे ते म्हणाले.
माध्यमे बदलताय : ट्रान्सजेंडर व्यक्तींविषयी प्रसारमाध्यमे सजग झाली असून पुर्वीपेक्षा यावर्गाच्या बातम्यांना प्रसिध्दी दिली जात आहे. मात्र माध्यम आणि ट्रान्सजेंडर यांच्यात संवाद वाढायला हवा असा सूर संपादकांच्या मनोगतांमध्ये व्यक्त झाला. दीपक पटवे म्हणाले की, ट्रान्सजेंडर व्यक्तींचे काही व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये जाणीवपुर्वक पसरवून नकारात्मक प्रतिमा तयार केली जाते. या व्यक्तींद्दल पुरेसे ज्ञान अथवा माहिती दिली जात नाही. माध्यम आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती यांच्यातील संवाद वाढायला हवा. शाळेत ट्रान्सजेंडर विषयी एखादा धडा पाठ्यपुस्तकात असायला हवा. माध्यमांमध्ये आता पुर्वीसारखी परिस्थिती राहिली नसली तरी खूप मोठा बदल झालेला नाही मात्र त्यांच्या सकारात्मक बातम्या वृत्तपत्रांमध्ये येवू लागल्या आहेत. या बातम्यांना पुरेशी जागा मिळायला हवी असेही पटवे म्हणाले. किरण अग्रवाल म्हणाले की,माणूस म्हटले की, पुरूष आणि स्त्री हे दोन वर्ग बघितले जातात. स्त्रीयांनाच माणुस म्हणून जिथे वागणूक मिळत नाही तिथे ट्रान्सजेंडर व्यक्तीला माणूस म्हणून कसे बघणार त्यामुळे अगोदर माणून केंद्री होता आले पाहिजे. पुर्वापार चालत आलेली मानसिक संकल्पना बदलावी लागेल. समाजातील सगळया घटकांचे श्वास टिपण्याचे काम वृत्तपत्रे करीत असतात. ट्रान्सजेंडर यांच्या सकारात्मक बातम्या आता प्रसिध्द होवू लागल्या आहेत. हे सांगतांना अग्रवाल यांनी काही बातम्यांची उदाहरणे दिली. हेमंत अलोने यांनी ट्रान्सजेंडर वर्ग हा समाज माध्यमांकडे वळला आहे, कारण मुख्य प्रवाहातील माध्यमे त्यांना सूमजून घ्यायला कमी पडतो आहे. अशी खंत व्यक्त करून माध्यमांनी त्यांच्यापर्यंत आणि त्यांनीही माध्यमांपर्यंत पोहचण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मनोज बारी यांनी ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या प्रबोधनाची गरज आहे. मुख्य प्रवाहात त्यांना आणण्यासाठी मसमजावून सांगितले तर ते समजून घेतात. असे सांगून वृत्तपत्रांची भूमिका या वर्गाबद्दल सकारात्मक राहीली आहे. असे प्रतिपादन केले.
माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक तथा मुख्य निमंत्रक प्रा. सुधीर भटकर यांनी प्रास्ताविक केले. सह निमंत्रक डॉ. गोपी सोरडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अॅङ सूर्यकांत देशमुख यांनी आभार मानले. गणितशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.के.एफ. पवार यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप झाला. विविध सत्रांचे सूत्रसंचालन तुलसी सुशीर व अमोल पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी रंजना चौधरी ,मंगेश बाविसाने,प्रल्हाद लोहार, पंकज शिंपी, भिकन बनसोडे, धनंजय देशमुख यांनी परिश्रम घेतले.
Discussion about this post