वरणगाव । रस्ते अपघाताचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीय. अशातच वरणगाव शहराजवळून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. नादुरुस्त उभा असलेल्या ट्रक मागून भरधाव वेगाने आलेले टँकर आदळला. या अपघातात दोन्ही वाहन चालकांचा मृत्यू झाला आहे. सदरची घटना ११ जुलैला रात्री दीडच्या सुमारास घडली.
भुसावळकडून मुक्ताईनगरकडे जाणारा ट्रक नादुरुस्त झाल्याने महामार्गाच्या कडेला उभा होता. यावेळी ट्रक नादुरुस्त असल्याने ते पाहण्यासाठी चालक नदीम नसीम खान (रा. नागपूर) हा ट्रक खाली उतरला होता. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेला १२ चाकी टँकरने मागून जोरदार धडक दिली. समोरील ट्रक न दिसल्याने चालक कुंभकरण (रा. अमेठी, उत्तर प्रदेश) याने मागून ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत टँकरच्या केबिनचा अक्षरश: चुराडा झाला असून, चालक कुंभकरण अडकला होता.
यावेळी नादुरुस्त ट्रकखाली असलेला नदीम नसीम खान हा देखील दाबला गेला. दोघांना बाहेर काढून वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याबाबत पोलिस कर्मचारी सुकराम सावकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसांत टँकरचालक कुंभकरण याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वरणगाव पोलिस तपास करीत आहेत.















Discussion about this post