जळगाव । जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील आकाश ओम त्रिवेदी याने UPSC परीक्षेत देशपातळीवर ७३ वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अवघ्या २३ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या या यशामुळे जळगाव जिल्ह्याचे नाव देशभरात उज्ज्वल झाले आहे.
आकाशने अभ्यासाच्या काळात सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहून साध्या मोबाईलचा वापर करण्यावर भर दिला. एकाग्रतेने अभ्यास करण्यासाठी त्याने डिजिटल व्यत्यय टाळले आणि वाचनाला जास्त वेळ दिला. त्याच्या मते, सातत्यपूर्ण मेहनत आणि योग्य नियोजनामुळेच हे यश शक्य झाले.
आकाशचे प्राथमिक शिक्षण जळगावच्या काशिनाथ पलोड स्कूलमध्ये झाले. तेथील शिस्त आणि संस्कारांनी त्याच्या आयुष्याला आकार दिला. त्यानंतर त्याने IIT कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक. पदवी प्राप्त केली. विशेष म्हणजे, त्याची निवड देशातील सर्वोत्तम व्यवस्थापन संस्था IIM अहमदाबाद येथेही झाली होती. मात्र, कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठ्या पगाराच्या नोकरीपेक्षा देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून त्याने नागरी सेवेचा मार्ग निवडला.
आकाशच्या या यशामागे त्याच्या कुटुंबियांचेही मोठे योगदान आहे. त्याच्या शिक्षण प्रवासात पालक म्हणून ॲड. ओम त्रिवेदी आणि रेखा त्रिवेदी यांनी नेहमीच मित्रवत भूमिका घेतली. मुलांवर अनावश्यक दडपण न आणता त्यांना स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा दोघांनी दिली. लहानपणापासूनच मुलांना उत्तम शिक्षण मिळावे, वाचनाची सवय लागावी आणि देश-विदेशातील घडामोडींविषयी माहिती मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले. आकाशचा लहान भाऊ अभय हा देखील नागपूर येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठात (NLU) शिक्षण घेत आहे. त्रिवेदी कुटुंबातील या दोन्ही सुविद्य पुत्रांनी एरंडोल शहराचे नाव उज्ज्वल केले आहे
आकाशच्या या यशाची बातमी समजताच एरंडोल शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी पेढे वाटून आणि फटाके फोडून जल्लोष केला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्रिवेदी कुटुंबीयांची भेट घेऊन आकाशचे अभिनंदन केले.















Discussion about this post