नंदुरबार । मागच्या काही दिवसापासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून नंदुरबार जिल्ह्यात देखील गेल्या आठ दिवसापासून रोज अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला असून काढणी केलेला कांदा आता शेतातच सडू लागला आहे. यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे. प्रामुख्याने फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. तसेच मका, कांदा या पिकांना देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या सुरवातीपासूनच अधूनमधून अवकाळी पावसाचे आगमन होत आहे. तर मागील आठ दिवसांपासून रोज वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन होत असल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. शिवाय शेती तयार करण्यात देखील अडचणी येत आहेत.
नंदुरबार तालुक्यातील आष्टा येथील शेतकरी सुकलाल आधार खंदारे यांनी त्यांच्या तीन एकर शेतात जानेवारी कांद्याची लागवड केली होती. लागवड, मजुरी, फवारणी या मशागतीतून त्यांना दीड लाखाचा खर्च आला. त्यांनी कांदा काढण्यासाठी सुरुवात केल्यानंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली. सहा दिवसापासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. मागील वर्षी कपाशीचे नुकसान झाल्यानंतर पिक विमा काढून ही त्यांना भरपाई मिळाली नाही. कांद्याचा पिक विमा काढत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे
नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ गावात झालेल्या जोरदार पाऊस आणि गारपिटीमुळे ३ एकर टरबुज पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याने लावलेल्या तीन एकर क्षेत्रातील टरबूज खराब झाले असून नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पिकासाठी लावलेला दीड ते २ लाखांचा खर्च यामुळे वाया गेला आहे. तर नुकसान झाल्याने ५ लाखांचे कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्याने उपस्थित केला आहे.
Discussion about this post