जळगाव । जळगावच्या राजकारणात माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. उन्मेश पाटील ठाकरे गटाच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत लवकरच शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. माजी खासदार पाटील यांच्या संभाव्य पक्ष प्रवेशाबाबत भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.यावेळी बोलताना महाजन यांनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यामुळे आगामी काळात महाजन-पाटील यांच्यातील शाब्दिक युद्ध आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.
काय म्हणाले मंत्री महाजन?
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उन्मेश पाटील यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करुन त्यांचे मित्र करण पाटील यांना जळगाव मतदारसंघाची उमेदवारी मिळवून दिली होती. तसेच मित्राच्या प्रचारासाठी जीवाचे रान केले होते. प्रत्यक्षात, भाजप उमेदवार स्मिता वाघ विजयी झाल्या. या दरम्यान, पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर जाहीर सभांमधून जोरदार टीका केली. प्रचार आघाडीवरही भाजपच्या नाकात दम आणण्यात उन्मेश पाटील यांना यश आले होते.
या सर्व घडामोडीनंतर माध्यमांशी बोलताना भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले होते, की माजी खासदार उन्मेश पाटील यांना संसदीय मंडळाच्या निकषांत न बसल्यामुळे भाजपने लोकसभेची उमेदवारी नाकारली होती. मात्र, त्यांनी भाजपचा राजीनामा देऊन थेट शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. भाजपशी एकनिष्ठतेचा दाखला दिला असतानाही पाटील यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आणखी थोडी वाट बघायला हवी होती. भाजपमध्ये माजी खासदार पाटील आणि त्यांचे मित्र करण पाटील यांना दोघांना पुढे मोठे भवितव्य होते. मात्र, त्यांनी खूप घाई केली. आपण किती मोठी चूक केली हे त्यांना आगामी काळात कळेल, असा सूचक इशारा देखील गिरीश महाजन यांनी त्यावेळी दिला होता.















Discussion about this post