जळगाव । कलेच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी संधी शोधावी लागते. ती चालून येत नाही. प्रसंगी संघर्षही करावा लागतो. त्यामुळे या क्षेत्रात अगोदर परिपूर्ण व्हा, झोकून देण्याची तयारी ठेवा, प्रामाणिक प्रयत्न केले तर यश निश्चित मिळते असे प्रतिपादन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभागाव्दारा आयोजित युवारंग युवक महोत्सव आणि दिव्यांग महोत्सवाचे उद्घाटन करतांना श्री. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी होते. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, महोत्सवाचे कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे विद्यार्थी विकास समन्वय समितीचे अध्यक्ष तथा व्य.प.सदस्य श्री. नितीन झाल्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. साहेबराव भूकन, प्रा. शिवाजी पाटील, प्रा.सुरेखा पालवे, डॉ. पवित्रा पाटील, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, सीए रवींद्र पाटील, प्रा. योगेश पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांची उपस्थिती होती.
शिवाजी लोटन पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, कलेसाठी स्वप्न साकारणे फार अवघड असते मात्र एकावेळी एकच स्वप्न बघा. आपल्याला कोणती कला जमते हे अगोदर तपासून बघा. अशा महोत्सवातून प्राप्त होणाऱ्या संधीचा लाभ घ्या. तुमच्या नावामुळे महाविद्यालयाची ओळख झाली पाहिजे असे सांगून मुंबईत जाण्यापूर्वी परिपूर्ण व्हा असा सल्ला त्यांनी दिला.
महोत्सवाचे कार्याध्यक्ष तथा व्य.प.सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी मनोगतात पूण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या ३०० व्या जन्मशताब्दीमुळे स्त्री सक्षमीकरण ही थीम या महोत्सवात ठेवण्यात आली असल्याचे सांगितले. अहिल्यादेवींनी सुराज्य, शासन व्यवस्था उत्तमरित्या विकसित केली आणि खऱ्या अर्थाने स्त्री सक्षमीकरण केले असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी नवसृजनेतेच्या या वयात तरुणांना अभिव्यक्तीची गरज असते आणि युवक महोत्सवाच्या माध्यमातून ती संधी तरुण पिढीला मिळत असते. त्याचा फायदा त्यांनी घ्यावा असे आवाहन केले. कलेच्या क्षेत्रातही करीअर करता येते हे सिध्द झाले आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिक्षणाशिवाय व्यक्ती, समाज आणि देशाला भवितव्य नाही त्यामुळे शिक्षण घेण्याचे आवाहन केले. केवळ पदवी प्राप्त करुन रोजगार मिळेल असे आता राहिलेले नाही. त्यामुळे कौशल्य प्राप्त करा, बोलण्याचे भान आणि ज्ञान ठेवा, महाविद्यालयात नियमित जा, परीक्षांमध्ये कॉपी करु नका कारण कॉपी करुन परीक्षेत पास व्हाल मात्र जीवनाची परीक्षा पास होता येणार नाही असा सल्ला त्यांनी दिला. आपल्या भाषणाची सुरुवात प्रा.माहेश्वरी यांनी, “ हर फैसला नही होता सिक्का उछालके, यह दिल का मामला है जरा संभालके, इस मोबाईलके जमाने के इनको क्या मालूम, हम खत मे रख दिया करते थे दिल निकाल के ” हा शेर सादर केला तेव्हा उपस्थित तरुणांनी प्रचंड दाद दिली. निवडणुकीची आचारसंहिता सुरु असून सादरीकरणात आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी कलावंतांनी घ्यावी असे आवाहन कुलगुरुंनी केले.
विद्यार्थी विकास विभागाचे संचालक व महोत्सवाचे संयोजक प्रा.जयेंद्र लेकुरवाळे यांनी विद्यापीठाची भूमिका विशद करतांना सांगितले की, युवक महोत्सवासोबतच दिव्यांग महोत्सव यावेळी घेतला जात आहे. त्या सोबतच अभ्यंकर नाटयगीत स्पर्धा आणि वाय.एस.महाजन मुलींची वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धेसोबतच घेतली जात आहे. या महोत्सवात ११९ महाविद्यालयातील ८०५ विद्यार्थिनी आणि ६०४ विद्यार्थी सहभागी झाले आहेत अशी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवात राज्यगीत, विद्यापीठ गीत व युवक महोत्सव गीताने झाली. सूत्रसंचालन डॉ. जी.ए.उस्मानी, प्रा.योगिता चौधरी व प्रा.विद्या पाटील यांनी केले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले. यावेळी महापालिकेचे नोडल अधिकारी प्रकाश पाटील यांनी कलावंतांना मतदान करण्याबाबत शपथ दिली. तसेच विद्यार्थिनी कृष्णानी पाटील हिने युवक महोत्सवाबाबत शपथ दिली.
यावेळी अधिष्ठाता डॉ.जगदीश पाटील, अधिसभा सदस्य डॉ. राजेश जवळेकर, डॉ.दिनेश पाटील, प्रा. आशुतोष पाटील, प्राचार्य एस.एन.भारंबे, डॉ.धीरज वैष्णव, प्रा. संदीप नेरकर, प्रा.गजानन पाटील, प्रा. मंदा गावीत, अमोल मराठे, अमोल सोनवणे, दिनेश चव्हाण, स्वप्नाली महाजन, नितीन ठाकूर, भानुदास येवलेकर, दीपक पाटील, सुरेखा पाटील, ऋषीकेश चित्तम तसेच संघ व्यवस्थापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
महोत्सवातील आजचे कार्यक्रम-
आज शुक्रवार दि.२५ ऑक्टोबर रोजी रंगमंच क्रमांक १ (पदवीप्रदान सभागृह -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह) येथे सकाळी ८.३० वाजता मिमिक्री, दुपारी १ वाजा मूकअभिनय.रंगमंच क्रमांक 2 (सिनेट सभागृह -राजमाता जिजाऊ सभागृह) येथे सकाळी ८.३० वाजता वक्तृत्व,
रंगमंच क्रमांक ३ (सामाजिक शास्त्रे प्रशाळा – ताराराणी सभागृह) सकाळी ८.३० वाजता भारतीय समुह गान
रंगमंच क्रमांक ४ (रासायनिक तंत्रज्ञान संस्था – राणी लक्ष्मीबाई सभागृह) सकाळी ८.३० वाजता स्वरवाद्य,
दुपारी १ वाजता तालवाद्य, सयंकाळी ४ वाजता शास्त्रीय गायन
रंगमंच क्रमांक ५ (जैवशास्त्र प्रशाळा – राणी दुर्गावती सभागृह) सकाळी ८.३० वाजता स्पॉट पेंटींग, दुपारी १ वाजता व्यंगचित्र, सायंकाळी ४ वाजता कोलाज या स्पर्धा होणार आहेत.