मुंबई । भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पंधरावी यादी जाहीर केली असून यात भाजपने मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. विशेष भाजपनं विद्यमान खासदार पूनम महाजन याचं तिकीट कापलं असून निकमांना उमेदवारी जाहीर केल्याने पूनम महाजन यांना मोठा धक्का दिला आहे.
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात आता दुरंगी लढत होणार असल्याचं निश्चित झालं आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने या मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे.
याआधी भाजपच्या पूनम महाजन या येथून भाजपच्या खासदार राहिल्या आहेत. त्यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसच्या विद्यमान खासदार प्रिया दत्त यांचा १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. पूनम महाजन यांना पुन्हा उमेदवारी मिळेल असं सांगितलं जात होते. मात्र आता पूनम महाजन यांचा पत्ताकट केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. त्यामुळे उज्ज्वल निकम हे आता महायुतीचे उमेदवार असतील. तर महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात आला आहे. काँग्रेसने या मतदारसंघातून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात आता उज्ज्वल निकम यांच्या विरोधात वर्षा गायकवाड यांच्यात लढत पाहायला मिळत आहे.
Discussion about this post