वर्ष २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट पडले आहे. तेव्हापासून ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नाहीय. यातच कालच कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी असंख्य पदाधिकाऱ्यांसह शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशावर बोलताना महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाने कोकणासह मुंबईत शिवसेनेला ताकद मिळणार असून आता कोकणामधील एकही उबाठाचा पदाधिकारी त्यांच्यासोबत नाही. त्यामुळे त्यांनी आता जागं व्हावं नाहीतर पुढील ६ महिन्यात उबाठाचा अंत होणार असल्याची प्रतिक्रिया योगेश कदम यांनी दिली. तर राज्यामध्ये ऑपरेशन टायगर सुरू झालं असून आता हे ऑपरेशन थांबणार नसल्याचं देखील योगेश कदम यांनी सांगितलं.
‘मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालंय कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा रत्नागिरी जिल्हा आहे. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाने ग्रामीण कोकणात नव्हे तर मुंबईसारख्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत चांगला परिणाम होणार आहे. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाने मुंबईमध्ये देखील चांगली ताकद आम्हाला मिळणार आहे. जसा विधानसभेला विजय प्राप्त केला तसा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भगवा झेंडा नक्कीच आम्ही फडकवू.’
योगेश कदम यांनी यावेळी ठाकरे गटावर टीका करताना सांगितले की, ‘त्यांनी विचार केला पाहिजे त्यांच्याकडे असलेले आमदार तर निघून गेलेच आता माजी आमदार देखील निघून जायला लागले आहेत. त्यांचा एकही जिल्हाप्रमुख राहिला नाही, एकही तालुकाप्रमुख राहिला नाही. कोकणामधील एकही पदाधिकारी आज त्यांच्यासोबत नाही. आता तरी त्यांनी जागं व्हावं, नाहीतर त्यांचा अंत पुढील सहा महिन्याच्या आत होणार आहे.’
Discussion about this post