मुंबई । यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी बंडखोरांनी पक्षाची डोखेदुखी वाढविली असून अशातच विधानसभेत पक्षविरोधात बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी सकाळी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास ठाकरेंनी नेत्यांना सांगितले होते. पण अनेकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे ठाकरेंनी कठोर कारवाई करत पाच जणांना पक्षातून निलंबित केलेय.
तिकीट नाकारल्यामुळे आपल्याच पक्षाच्या विरोधात उतरलेल्या बंडखोरांवर ठाकरेंनी मोठी कारवाई केली आहे. अखेरच्या दिवशीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे ठाकरेंनी कारवाई केली. भिवंडी पूर्वचे रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगुल, संजय अवारी आणि प्रसाद ठाकरे यांच्यावर निलंबनाची करवाई करण्यात आली आहे.
मविआला बंडखोरांचा ताप, १४ ठिकाणी फटका –
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बंडखोरीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. १४ मतदारसंघात बंडखोर नेते विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षातील नेते मैदानात उतरलेत. ठाकरेंनी बंडखोरी मागे घेण्यास आपल्या नेत्यांना सांगितले. पण बंडोबा आपल्या निर्णायावर कायम राहिले, त्यामुळे ठाकरेंनी निलंबनाची कारवाई केली. उद्धव ठाकरेंनी पाच जणांना निलंबित केले.