मुंबई । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता आगामी काळात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचं बिगूल हे पुढच्या चार ते सहा महिन्यात लागण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे जिल्हाप्रमुख, नवनिर्वाचित खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालावर मंथन करण्यात आलं. कोणत्या जागांवर ठाकरे गटाचा विजय झालाय त्या ठिकाणी आता पक्ष संघटनेसाठी कशाप्रकारे चांगलं काम करता येईल, याबाबत चर्चा झाली.
तसेच या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले. लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता ज्या चुका या निवडणुकीत झाल्या त्या चुका टाळण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात काही जागांवर उमेदवारांची निवड उशिराने झाली. त्यामुळे त्याचे परिणाम त्या-त्या पक्षांना भोगावी लागली. तसेच निवडणुकीत काही मतदारसंघांमध्ये योग्य तिढा न सुटल्यामुळे उमेदवाराचा पराभव झाल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी सर्वजण आधी झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न करणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी याचबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना नेमक्या सूचना काय?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरु करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, जागावाटपाची चिंता करु नका. राज्यात महाविकास आघाडी मजबूत व्हावी यासाठी काम करा, अशा महत्त्वाच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी आजच्या बैठकीत आपलं लक्ष्य कार्यकर्त्यांसमोर मांडलं आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहे. यापैकी 180 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावेत, यासाठी काम करण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या.
Discussion about this post