मुंबई । लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे कल्याणमधून अद्याप शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर होत नसतानाच उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिदे यांना टक्कर देण्यासाठी ठाकरेंनी वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गट कोणाला उमेदवारी देणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे, आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांच्याही नावाची चर्चा झाली. मात्र उद्धव ठाकरेंनी सर्वांना धक्का देत सामान्य शिवसैनिका असलेल्या वैशाली दरेकर यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
कोण आहेत वैशाली दरेकर राणे?
वैशाली दरेकर यांनी शिवसेना नगरसेविका म्हणून काम केले आहे. सध्या त्या ठाकरे गटाच्या उपशाखा संघटक आहेत. २००९ पुर्वी त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होत्या. त्यांनी मनसेकडून २००९ मध्ये लोकसभा निवडणुकही लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी एका लाखांपेक्षा अधिक मते मिळवली होती. त्यानंतर मनसे सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही त्या ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिल्या.
ठाकरे गटाकडून लोकसभेचे उमेदवार जाहीर..
दरम्यान, आज शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये कल्याणमधून वैशाली दरेकर , जळगावमधून करण पवार, हातकणंगलेमधून सत्यजित पाटील आणि पालघरमधून भारती कामडी यांच्या नावाचा समावेश आहे.
Discussion about this post