मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु असून याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी यांनी आज मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला आहे. या मतदारसंघात अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणाकेली आहे. जुहू येथील कार्यक्रमात बोलतांना उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली आहे.
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला किती मतदारसंघ मिळणार याबाबत अजूनही कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही. अशात मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याची चर्चा सुरु असतानाच, स्वतः उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघातील आपला उमेदवार घोषित करून टाकला आहे. ‘अमोल कीर्तिकर आपला लोकसभेचा उमेदवार आहे. त्यांना जिंकून द्यायचा आहे,’ असे उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे.
उद्धव ठाकरेंच्या या घोषणेनंतर काँग्रेसकडून इच्छूक असलेल्या संजय निरुपम यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.संजय निरुपम यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘काल संध्याकाळी उरलेल्या शिवसेनाप्रमुखांनी अंधेरी येथील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित केला. त्यानंतर रात्रीपासून फोन येत आहेत. हे कसे होऊ शकते? महाविकास आघाडीच्या दोन डझन बैठका होऊनही जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. अद्याप निर्णय न झालेल्या प्रलंबित ८-९ जागांपैकी ही एक जागा आहे. असे मला जागावाटप बैठकीमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे.’
Discussion about this post