मुंबई : शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेली. या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र, सामंत यांनी या भेटीचे कारण स्पष्ट करत राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला. त्यांनी सांगितले की, ही भेट अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कामकाजासंदर्भात होती आणि यात कोणतेही राजकीय संदर्भ नाहीत.
भेटीचे कारण काय?
उदय सामंत यांनी पत्रकारांना सांगितले की, शरद पवार हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे मुख्य विश्वस्त आहेत, तर सामंत स्वतः या संस्थेचे कोषाध्यक्ष आणि विश्वस्त आहेत. या भेटीत नाट्य परिषदेच्या जिल्हा शाखांच्या उत्थानासाठी आणि संस्थेच्या भविष्यातील धोरणात्मक निर्णयांवर चर्चा झाली.
सामंत म्हणाले, “शरद पवार यांनी ११ सप्टेंबर २०२५ रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात विश्वस्तांची विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीत नाट्य परिषदेच्या विकासासाठी महत्त्वाचे धोरण ठरवले जाणार आहेत. मी या कमिटीचा भाग असल्याने आजच्या बैठकीसाठी उपस्थित होतो.”
उदय सामंत आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते, विशेषतः गणेशोत्सव आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर. काहींनी ही भेट शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) यांच्यातील संभाव्य जवळीक किंवा चर्चेचा भाग असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, सामंत यांनी स्पष्ट केले की, “या भेटीत राजकारणाचा लवलेशही नव्हता. ही पूर्णपणे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कामकाजासाठी आयोजित बैठक होती.”















Discussion about this post