जळगाव | जळगाव जिल्ह्यात लाचखोरीची प्रकरणे सातत्याने उघडकीस येत असून अशातच आणखी एका लाचखोरीच्या घटना समोर आलीय. वाळूने भरलेला डंपर पकडल्यानंतर त्यावर कारवाई न करता तो सोडून दिल्याच्या मोबदल्यात ३० हजार रूपयांची लाच स्वीकारताना महसूल विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ममुराबादचे तलाठी सदानंद व्यंकटी मुंडे (वय ३४) आणि म्हसावदचे मंडळ अधिकारी अभिजित नामदेव येवले (वय ३९) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून, तलाठी सदानंद मुंडे यांनी ४ फेब्रुवारी रोजी रात्रपाळीच्या कर्तव्यावर असताना गस्ती दरम्यान वाळूने भरलेला डंपर पकडला होता. मात्र, सदरचा डंपर मंडळ अधिकारी अभिजित येवले यांनी फोन केल्यानंतर तलाठी मुंडे यांनी सोडून दिला होता. अवैधरित्या वाळू वाहून नेणारा डंपर सोडून दिला आणि कोणतीच कारवाई केली नाही म्हणून नंतर तलाठी मुंडे आणि मंडळ अधिकारी येवले यांनी तक्रारदाराकडे सुमारे ५० हजार रूपये लाचेची मागणी केली.
परंतु, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली. त्यानुसार, प्रत्यक्ष पडताळणी केल्यावर तलाठी सदानंद मुंडे आणि मंडळ अधिकारी अभिजित येवले यांनी कोणतीही कारवाई न करता वाळुचे डंपर सोडण्याच्या मोबदल्यात ५० हजार रूपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ३० हजार रूपये लाच तलाठी मुंडे यांनी स्वीकारली. त्यामुळे तलाठी आणि मंडळ अधिकारी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
यांनी केली कारवाई?
ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक योगेश ठाकूर, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, सापळा पथकातील रेश्मा अवतारे, सुरेश पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने, प्रदीप पोळ, चंद्रशेखर चौधरी यांनी यशस्वी केली.















Discussion about this post