नाशिक । राज्यात लाचखोरीच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशातच तीस हजार रुपयांची लाच घेताना नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. डॉ. आबिद आबू अत्तार (40), डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार (42) रा. इंदिरानगर, नाशिक अशी या लाचखोर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे मित्र हे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असून, शासकीय नियमाप्रमाणे ज्या बंदी कैदीचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे. तसेच ज्या कैद्याने 14 वर्षे शिक्षा भोगलेली आहे. त्या कैद्यांना शासनाने नेमून दिलेली समिती सोडून देते. परंतु अशा कैद्यांना बाहेर सोडण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या फिट फॉर सर्टिफिकेटची गरज असते.
तीस हजारांची लाच स्वीकारताना जाळ्यात
या सर्टिफिकेटसाठी दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रारदाराच्या मित्रांकडे चाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, तडजोडीअंती तीस हजार रुपये देण्याचे ठरले. पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताना दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यांना पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post