जामनेर । विहिरीतून कबूतर पकडण्यासाठी गेलेल्या तळेगाव (ता. जामनेर) येथील दोन अल्पवयीन मुलांचा विहीरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.अनिकेत जितेंद्र जोहरे (वय १३) आणि अभय भागवत कोळी (वय १७, रा. तळेगाव ता. जामनेर) अशी या मृत बालकांची नावे आहेत.
दोन्ही मुलांचे घरचे मोलमजुरी करून गुजराण करीत होते. दोन्ही मुले शुक्रवारी सकाळी दोर घेऊन घराबाहेर पडली. रस्त्यात भेटलेल्या मित्रांनादेखील त्यांनी सोबत येण्याचा आग्रह धरला. मात्र त्यांनी नकार दिल्याने हे दोघे जण जंगलाकडे निघाले. सायंकाळपर्यंत मुले घरी परत न आल्याने त्यांच्या पालकांनी शोध घेण्यास सुरुवात केली.
काही मुलांनी अनिकेत व अभय ज्या मार्गाने गेले त्याची माहिती दिली, त्याप्रमाणे ग्रामस्थांनी शोध घेतला. त्यावेळी एका विहीरीत दोघांचे मृतदेह आढ ळून आले. रात्री पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शनिवारी सकाळी दोघांचे मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. डॉ. हर्षल चांदा यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यावरुन जामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेने गावात शोककळ पसरली आहे.
Discussion about this post