मुक्ताईनगर | पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजता सालबर्डी, ता. मुक्ताईनगर शिवारातील तलावात घडली.
वेदांत कृष्णा ढाके (१६) व चिराग कृष्णा ढाके (११), अशी या बुडून मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत. सालबर्डी गावातील वेदांत व चिराग ही दोन्ही मुले रविवारी दुपारी बकऱ्या चारण्यासाठी परिसरातील जंगलात गेले होते. जवळच तलाव असल्याने चिराग हा पोहण्यासाठी उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. हा प्रकार लक्षात येताच वेदांत हा त्याला वाचविण्यास गेला असता दोघांचाही बुडून मृत्यू झाला
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सालबर्डी शिवारात मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्यामुळे तलाव तयार झाला आहे. याच तलावाने बालकांचा बळी घेतला. वेदांत आणि चिराग या मुलांचे वडील रिक्षाचालक आहे, तर आई शेतमजुरी करते.
Discussion about this post