जळगाव । साडेतीन मुहूर्तापैकी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्णनगरी जळगावात सोन्याला दीडपटीने मागणी राहून या मुहूर्तावर एकूण १७५ फर्ममध्ये २५ ते ३० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. राज्यभरात बेरोजगारीची चिंता व्यक्त केली जात असताना गुढीपाडव्याच्या निमित्ताने जळगावात मात्र सोने खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला अनन्य महत्त्व असल्याने जळगावात सोने खरेदीसाठी या दिवशी मोठी गर्दी होत असते. यंदाही असे सुखद चित्र पहावयास मिळाले. गेल्या काही महिन्यात सोन्याच्या दरांमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्यात 18 हजारांनी वाढ झाली आहे. सोन्याच्या दराने विक्रमी 90 हजारांचा टप्पा गाठला असला तरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जळगाव सुवर्णनगरीत 25 ते 30 कोटींची उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% सोनं खरेदीत वाढ झाली आहे.
रविवारी (३० मार्च) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचे भाव २०० रुपयांनी कमी होऊन ते ८९ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर राहिले. तर, चांदीचे भाव एक लाख एक हजार रुपये प्रति किलोवर स्थिर राहिले. ऐन मुहूर्तावर सोन्याचे भाव काहीसे कमी झाल्याने ग्राहकांनीही खरेदीचा आनंद घेतला.
Discussion about this post