देशभरात अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून याच दरम्यान बिहारची राजधानी पटनामध्ये भरधाव ट्रक आणि रिक्षात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीय. या अपघातात ७ मजुरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कामावरून घरी परतताना रिक्षातील मजुरांचा अपघात झाल्याची घटना घडली. पटना येथील मसौढी-नौबतपूर मार्गावरील धनीचक वळणावर रविवारी सांयकाळी अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातात मृत पावलेल्या मजुरांची ओळख पटली आहे. मतेंद्र बिंद (२५), उमेश बिंद (३८), विनय बिंद (३०), रमेश बिंद (५२), सूरज ठाकूर (२०), उमेश बिंद (३०), रिक्षाचालक सुशीलकुमार (३५) यांच्या नावाचा समावेश आहे. तर ६ मजूर डोरीपार येथे राहणारे आहेत. तर सुशीलकुमार हा हंसाडीह गावात राहायला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, ६ मजूर काम करून घरी जाण्यासाठी रिक्षाने निघाले होते. दोन्ही वाहनांचा रस्त्याच्या किनाऱ्यावरील एका खड्ड्याजवळ अपघात झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, जेसीबीच्या मदतीने वाहनांना बाजूला काढण्यात आलं. अपघातानंतर ढिगाऱ्यातून मृतदेह बाजूला काढून ताब्यात घेण्यात आले. मढौरी पोलीस ठाण्याचे एसएचओ विजय यादवेंदू यांनी सांगितलं की, ‘चालकाने ट्रकवरील नियंत्रण गमावल्यानंतर अपघात झाला’. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
Discussion about this post