आसाममधील गोलाघाट येथे भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास गोलाघाट येथील बलिजन भागातील डेरागावजवळ हा अपघात झाला. जिथे ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. गोलाघाट एसपींनी सांगितले की, अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर 25 जण जखमी झाले आहेत.
अपघात एवढा भीषण होता की बसच्या पुढील भागाचे तुकडे झाले. एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये अपघातानंतर बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाल्याचे दिसत आहे. ही बस गोलाघाटहून तिनसुकियाच्या दिशेने जात होती. बसमध्ये एकूण 45 प्रवासी होते. तर अपघातग्रस्त ट्रकमध्ये कोळसा भरला होता. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने बसमध्ये एकच गोंधळ उडाला. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले.
दोन्ही वाहनांच्या चालकांचा मृत्यू
या अपघातात दोन्ही वाहनांच्या (बस-ट्रक) चालकांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना डेरगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथून गंभीर जखमींना जोरहाट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.
Discussion about this post