मुंबई । नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा उद्या म्हणजेच १६ जुन पासून सुरू होत आहेत. अशातच शालेय विद्यार्थ्यांसाठी परिवहन मंत्र्यांनी एक दिलासा देणार निर्णय घेतलाय. शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही विशेष मोहीम सुरू केली आहे.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक वर्ष 16 जूनपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंत प्रवासासाठी 66.66% सवलतीसह केवळ 33.33% रक्कम भरून मासिक पास मिळेल. तसेच, “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” योजनेअंतर्गत बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास दिले जातात. पूर्वी पाससाठी विद्यार्थ्यांना आगारात किंवा पास केंद्रावर रांगेत उभे राहावे लागत होते. आता शाळा-महाविद्यालयांनी दिलेल्या यादीवरून एसटी कर्मचारी थेट शाळेत पास वितरित करतील. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल आणि शैक्षणिक प्रगतीला बाधा येणार नाही.
Discussion about this post