रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी झटका देणारी बातमी आहे. भारतीय रेल्वेने प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून ही दरवाढ आजपासून म्हणजेच २६ डिसेंबरपासून लागू होणार आहे. यामुळे आता लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.
कुठे आणि किती झाली दरवाढ?
२१५ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी साधारण वर्गाच्या अर्थात जनरल क्लासच्या भाड्यात प्रति किलोमीटर १ पैशाने वाढ करण्यात आली आहे. तर, मेल/एक्स्प्रेस गाड्यांमधील नॉन-एसी क्लास आणि सर्व गाड्यांच्या एसी क्लासच्या भाड्यात प्रति किलोमीटर २ पैशांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच, जर तुम्ही ५०० किलोमीटरचा प्रवास करणार असाल, तर तुमच्या तिकीटात १० रुपयांची वाढ झालेली दिसेल.
या दरवाढीचा परिणाम राजधानी, शताब्दी, दुरंतो, वंदे भारत, तेजस, हमसफर आणि अमृत भारत यांसारख्या सर्व प्रीमियम गाड्यांवर होणार आहे. याशिवाय अंत्योदय, गरीब रथ आणि जनशताब्दीच्या प्रवाशांनाही आता वाढीव भाडे मोजावे लागेल. २६ डिसेंबर किंवा त्यानंतर बुक होणाऱ्या सर्व तिकिटांना हे नवे दर लागू होतील. मात्र, ज्या प्रवाशांनी २६ डिसेंबरपूर्वीच आगाऊ आरक्षण केले आहे, त्यांना ही दरवाढ लागू होणार नाही.
रेल्वेने चालू वर्षात दुसऱ्यांदा भाडेवाढ केली आहे. यापूर्वी जुलै महिन्यात तिकीटांचे दर वाढवण्यात आले होते. आता सहा महिन्यांच्या आतच पुन्हा ही वाढ करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे.
किती झाली वाढ?
> २१५ किलोमीटरपर्यंत प्रवासासाठी कोणतेही वाढीव भाडे नसेल.
> २१६ ते ७५० किमी प्रवासासाठी साधारण ५ रुपये वाढतील.
> ७५१ ते १२५० किमी प्रवासासाठी १० रुपये वाढतील.
> १२५१ ते १७५० किमी प्रवासासाठी १५ रुपये वाढतील.
> तर २२५० किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी २० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.















Discussion about this post