हिंगोलीमांडून अपघाताची एक भयंकर घटना समोर आलीय. ज्यात शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव शिवारात हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली- नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव येथे ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील शेतकरी महिला मजूर या ट्रॅक्टरमधून प्रवास करत होत्या. सर्व महिला मजूर हळद काढण्यासाठी ट्रॅक्टरमधून जात होत्या त्यावेळी अचानक अपघात झाला. ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे. सकाळी ७ वाजता ही घटना घडली. २ महिलांसह एका पुरुषाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. ८ जण विहिरीमध्ये बुडाले असून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांना विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हिंगोलीसह नांदेड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. धक्कादायक म्हणजे या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालेले असल्याने विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला असून ट्रॅक्टरचे केवळ एक टायर दिसत आहे. ट्रॅक्टर मध्ये नेमके किती जण होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेमुळे आलेगाव येथे एकच खळबळ उडाली आहे.
Discussion about this post