जळगाव । पुण्यावरून अमरावतीला जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये तोतया टीसीचा भंडाफोड झाला आहे. टीसी तोतया असल्याचं उघड झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी टीसीला ताब्यात घेतलं आहे. विद्यार्थ्यांनी तोतया टीसीचा प्रताप उघडकीस आणल्यानंतर त्याचं कौतूक करण्यात येत आहे.
हिंगोलीमध्ये एक्सप्रेस रेल्वेमध्ये बोगस टीसीचा गोंधळ पाहायला मिळाला आहे. ही एक्सप्रेस पुण्याहून अमरावतीला जात होती. दरम्यान हिंगोलीमध्ये एका तोतया टीसीचा भंडाफोड काही विद्यार्थ्यांनी केला आहे. दिनेश महाडिक असं तोतया टीसीचे नाव आहे.
तोतया टीसी चक्क रेल्वे विभागात नियुक्त असल्याप्रमाणे यूनिफॉर्म घालून आला. नंतर प्रवाशांच्या तिकीटांची चौकशी करू लागला. तिकीटांची चौकशी करत असताना, त्यानं मद्यपान केलं असल्याचं काही प्रवाशांना आढळून आलं. त्यावेळेस काही प्रवासी तोतया टीसीकडे संशयाच्या नजरेनं पाहू लागले.
त्यानंतर काही प्रवाशांनी तोतया टीसीकडे आयडी कार्डची मागणी केली. ‘माझ्याकडे आयडी कार्ड नाही, मी का आयडी कार्ड दाखवू’ अशा उर्मट भाषेत उत्तर दिलं. नंतर त्यानं काही प्रवाशांना दमदाटीही केली. टीसीचं हे वागणं काही प्रवाशांना संशयास्पद वाटलं. या प्रकरणी काही प्रवाशांनी याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. रेल्वे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तोतया आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
Discussion about this post