मुंबई : राज्यातील महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज (१ एप्रिल) पासून टोल दरात सरासरी ३ ते ५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून या निर्णयामुळे प्रवासाचा खर्च वाढणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या दरवाढीमुळे वाहनधारकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.
माहितीनुसार, एनएचएआय (NHAI) च्या राज्यातील सुमारे ७० टोलनाक्यांवर तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) ३५ प्रमुख टोलनाक्यांवर नवीन दर लागू करण्यात आले आहेत. या वाढीचा परिणाम कार, जीप, बस आणि ट्रक अशा सर्व प्रकारच्या वाहनांवर होणार आहे.
दरम्यान, टोल दरवाढीसोबतच टोलनाक्यांवर रोख व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णयही अधिक कठोरपणे अंमलात आणण्यात आला आहे. त्यामुळे आता वाहनधारकांना केवळ फास्टॅग किंवा डिजिटल पेमेंटद्वारेच टोल भरावा लागणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवर तसेच सोलापूर-पुणे आणि इतर प्रमुख महामार्गांवर प्रवास करणाऱ्यांना या बदलांचा थेट परिणाम जाणवणार आहे.
वाहनधारकांनी प्रवासाला निघण्यापूर्वी फास्टॅग सक्रिय आहे का आणि त्यामध्ये पुरेसा बॅलेन्स आहे का, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बॅलेन्स अपुरा असल्यास दंड आकारला जाऊ शकतो. तसेच टोलनाक्यांवर क्यूआर कोड स्कॅन करून यूपीआयद्वारेही त्वरित पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.















Discussion about this post