मुंबई । मागच्या काही दिवसापासून सुरु असलेला पाऊस आता सुट्टीवर गेला आहे. पुढील चार दिवस राज्यात पाऊस ब्रेक घेणार आहे. विदर्भ वगळता कुठेही पावसाचा अलर्ट दिला नाही. विदर्भात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. राज्यात रेड आणि ऑरेंज अलर्ट कुठेही दिला नाही.
हवामान विभागाने राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार जून आणि जुलै महिन्यात मराठवाडा वगळता चांगला पाऊस झाला. यावर्षी मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तसेच सध्या तरी मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल वातावरण नाही, असे हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी म्हटले आहे. राज्यात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पुढील दोन-तीन दिवसांत पुणे शहर आणि शहरालगत मुसळधार पाऊस नाही. मात्र 20 तारखेच्या पुढे पावसाचा जोर वाढणार असल्याचे सानप यांनी म्हटले आहे.
नागपूरसह विदर्भातील काही भागातून पाऊस गायब झाला आहे. आठ ते दहा दिवसांचा पावसाचा खंड पडल्याने शेतकरी चिंतेत आहे. खरीपातील सोयाबीन, कापसाचे पीक सुकायला लागले आहे. पावसाअभावी पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस नसल्याने उत्पादनावरही परिणाम होणार आहे. सध्या हवामान विभागाने विदर्भात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
Discussion about this post