राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून सध्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील विश्रांतीनंतर सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना दिलासा मिळाला. दरम्यान, जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी आज मंगळवारी पाऊस होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज (ता. 20) कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. यापार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.
या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
भारतीय हवामान खात्याने आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा. तसेच सांगली जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी केलाय. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आलाय.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. दुसरीकडे विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
Discussion about this post