जुन्नर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून यात अनेकांना जीववार मुकावे लागतं आहे. अशातच आणखी एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नगर-कल्याण महामार्गावर ट्रकने रिक्षा आणि पिकअपला दिलेल्या जोरदार धडकेत दोन चिमुकल्यांसह ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले.
ही घटना जुन्नर तालुक्यातील अंजिराची बाग परिसरात घडली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांचा समावेश आहे. गणेश मस्करे (वय ३०), कोमल मस्करे (वय २५ वर्ष ) हर्षद मस्करे (वय ४ वर्ष) काव्या मस्करे (वय ६ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. अन्य मृतांची नवे अद्याप समोर आली नाही. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मढ येथील भाजीपाला व्यवसाय करणारे पती, पत्नी आणि दोन लहान मुलांसह रिक्षाने प्रवास करीत होते. यावेळी जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळील अंजिराची बाग येथे त्यांच्या रिक्षाला ट्रक आणि पिकअपने जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता, की रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भयानक घटनेत गणेश मस्करे, कोमल मस्करे त्यांची दोन चिमुकली मुलं, यांच्यासह ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
आठही जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी ओतूर येथील रुग्णालयात पाठवले आहेत. अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Discussion about this post