धुळे : धुळ्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यामुळे वाहनधारक धास्तावले आहे. या दरम्यान साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीची घटना उघडकीस आली होती. याबाबत दाखल तक्रारीवरून पोलिसांनी तपास केला असता चोरटा सापडून आला. तसेच मालेगाव येथून आणखी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे झालेल्या मोटारसायकल चोरी संदर्भात पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना या मोटरसायकल चोरीची उकल करण्याचे आदेश दिले होते. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्र फिरवली असता साक्री येथील एका मोटरसायकल चोरट्यासह मालेगाव येथील दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांनी या तीनही चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे असलेल्या चोरीच्या सर्व १८ मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच या चोरट्यांकडून आणखी मोटरसायकल चोरीची उकल समोर येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे.















Discussion about this post