जळगाव । यावल तालुक्यातील परसाडे गावांमधील तीन ग्रामपंचायत सदस्य तिसऱ्या अपत्य असल्याने तिघांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकतेच काढले आहे. याबाबत सिकंदर इस्माईल तडवी आणि कमल कान्हा तडवी (दोन्ही रा. परसाडे ता. यावल) यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सन-२०२२ मध्ये यावल तालुक्यातील परसाडे ग्रामपंचायतमधून खल्लोबाई युनूस तडवी, मदिना सुभेदार तडवी आणि रमजान छबु तडवी हे तीन उमेदवार ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूकीत निवडून आले होते. दरम्यान, या निवडून आलेल्या तिघा उमेदवारांना तीन अपत्ये आहे अशी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाला चौकशीचे आदेश देवून तसा अहवाल पाठविण्याच्या सुचना दिल्या होत्या. अर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र दस्ताऐवज, यावल तालुका आरोग्य अधिकारी, यावल तहसील कार्यालय आणि यावल येथील वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या अहवालाचे अवलोकन जिल्हाधिकारी यांनी केल्यानंतर तिघांना तिसरे अपत्य असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४(ज-१) नुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी खल्लोबाई युनूस तडवी, मदिना सुभेदार तडवी आणि रमजान छबु तडवी या तिघांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र घोषित केले आहे, तसे आदेश ३० डिसेंबर रोजी काढण्यात आले आहे. या कारवाईमुळे यावल तालुक्यातील राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.
Discussion about this post