मुंबई : यंदा उशीरा का होईना, राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. राज्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी राज्यातील काही भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जळगाव जिल्हात देखील पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याचं शेतकरी सांगत आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार? याची वाट बळीराजा पाहत आहे.
अशातच हवामान खात्याने पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे. गुजरात ते केरळ किनारपट्टीवर असलेली ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. परिणामी बुधवारी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशातच राज्यात आता पुढील ७२ तासांत पावसाचा जोर आणखीच वाढणार असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, मुंबई, ठाण्यामध्ये काही ठिकाणी बुधवारी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाचाही अंदाज आहे.
या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
हवामान खात्याने पुढील ४ दिवसांत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्हयासह विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपुर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
याशिवाय पुणे, नाशिक, पालघर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणातील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे
Discussion about this post