जळगाव : श्रीक्षेत्र रामेश्वर येथे दर्शनासाठी गेलेल्या एरंडोल शहरातील तिघा चुलत भावांचा त्रिवेणी संगमावर बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. सागर अनिल शिंपी (वय २४), पियुष रवींद्र शिंपी (वय २३), अक्षय प्रवीण शिंपी (वय २४) असे मृत झालेल्या मुलांची नावे आहेत. तरुणांच्या मृत्यूने शिंपी परिवारावर शोककळा पसरली आहे.
याबाबत असे की, श्रावण सोमवारचे निमित्त साधून जळगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र रामेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. दुपारी ते त्याठिकाणी पोचले. अंजनी, तापी, गिरणेच्या संगमावरील या क्षेत्राचे पावित्र्य व विशेष महत्त्व आहे. त्यामुळे हे तरुण दर्शनाआधी संगमावर स्नान करण्यासाठी म्हणून नदीपात्रात उतरले. त्याठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. एक- दोन जणांनी कसातरी किनारा गाठत स्वत:ला वाचविले. मात्र सागर, पियुष व अक्षय शिंपी हे तिघेही चुलत भावंडं पात्रात बुडाले.
त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर त्याठिकाणी गर्दी जमली. आधी स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपयोग झाला नाही. आपत्ती व्यवस्थापन पथकासह स्थानिक पट्टीच्या पोहणाऱ्या भिल्ल युवकांनी शोधाशोध सुरु केली. सायंकाळपर्यंत सागर व पियुष शिंपी यांचे मृतदेह शोधण्यात त्यांना यश आले. पहिलाच श्रावण सोमवार असल्याने याठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. घटनेचे वृत्त कळल्यानंतर एरंडोल येथून मोठी गर्दी या स्थळी पोचली.
Discussion about this post