कोल्हापूर : वेगवेगळ्या हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस करिता आवश्यक त्या सोयी सुविधाची तपासणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रुपयाची लाच मागितली. तडजोडी अंती तीस हजार लाच स्वीकारताना उच्च शिक्षण कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील शिक्षण सहसंचालक डॉ. हेमंत नाना कठरे, कनिष्ठ लिपिक अनिल जोंग आणि स्टेनो प्रविण शिवाजी गुरव या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहात अटक केली. या कारवाईने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली
भ्रष्ट कारभारामुळे वादग्रस्त ठरलेल्या शिक्षण सहसंचालक कार्यालयावर ही झालेली पहिलीच कारवाई होय. डॉ. हेमंत कठरे यांच्याकडे शिक्षण सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. डॉ. कठरे हे राजाराम महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत. डॉ. कठरे यांच्याकडे चार मे २०२३ रोजी शिक्षण सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. कठरे यांनी १४ जुलै २०२१ ते १३ जानेवारी २०२३ या कालावधीतही शिक्षण सहसंचालकपदाचा कार्यभार सांभाळला होता.
दरम्यान शिक्षण सहसंचालक कार्यालयातील कामकाज नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. शैक्षणिक संस्थे अंतर्गत नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या दोन वेगवेगळ्या हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस करिता आवश्यक त्या सोयी सुविधा आहेत अगर कसे याची तपासणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधितांनी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती तीस हजार रुपये निश्चित केली. बुधवारी संबंधित तक्रारदाराकडून तीस हजार रुपये स्विकारताना कारवाई झाली. पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे, पोलिस हेड काँन्स्टेबल प्रकाश भंडारे, विकास माने, सुनील घोसाळकर, पोलिस काँन्स्टेबल रुपेश माने, मयूर देसाई, संदीप पवार, उदय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Discussion about this post