मुंबई । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठे यश मिळाले असून यांनतर शरद पवार गटाचा उत्साह प्रचंड वाढलेला आहे. पक्षनेतृत्वानं लागलीच आगामी विधानसभा निवडणुकीचीही तयारी केल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार थेट दुष्काळी दौऱ्यावर निघाले असून, गेल्या काही दिवसांपासून केलेल्या त्यांच्या वक्तव्यांनी राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा होऊ लागली आहे
दोन्ही सरकार आज आमच्या हातात नाहीत. पण लोकसभा निवडणुकीत जसं काम झालं, तसं काम केलं तर राज्य सरकार कसं आपल्या हातात येत नाही ते मी बघून घेतो, असे शरद पवार म्हणाले. लोकसभेला जे योग्य होतं, ते तुम्ही केलं. विधानसभेलाही जे योग्य आहे ते करा, असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं. शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकांसाठी मोठा प्लान केला आहे की काय? अशी चर्चा सुरू आहे.
शरद पवार दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. ते आज, बुधवारी बारामतीमधील निरा वागज गावात आले. दौऱ्यातील हे तिसरे गाव आहे. त्यांचं या गावात स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. सुप्रिया सुळे यांना तुम्ही निवडून दिलं. त्यांच्या कामाला प्रोत्साहन दिलं. हे सर्व तुमच्या पाठिंब्यामुळं शक्य झालं, अशा शब्दांत त्यांनी मतदारांचे आभार मानले. आता विधानसभा निवडणुकीचाही विचार करावा लागेल. राज्य हाती घ्यायचं असेल तर, पुढील दोन-तीन महिने काम करावं लागेल, असंही ते म्हणाले.
सत्ता येते, सत्ता जातेही!
शरद पवार यांनी यावेळी गावकऱ्यांचे आभार मानून कौतुकही केले. ते म्हणाले की, सत्ता येते, तशी जातेही. आलेली सत्ता लोकांच्या जीवनात बदल करण्यासाठी वापरली तर लोक आठवण ठेवतात. काही तात्पुरते यशस्वी ठरतात. मी नेहमी सांगतो की देशात लोकशाहीचं राज्य आहे.















Discussion about this post