जळगाव : जळगाव-भुसावळ मार्गावरील गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अज्ञात चोरट्यांनी केलेल्या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी कॉलेज परिसरात प्रवेश करून थेट कॅशियर ऑफिसचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. कार्यालयातील अंदाजे १० ते ११ लाख रुपयांची रोकड चोरीस गेली आहे.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात दिवाळीनिमित्त सुट्ट्यांमुळे काही कार्यालये बंद होती. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री संस्थेत प्रवेश केला. पहाटे चार वाजेच्या सुमारास ही चोरी उघडकीस आली. चोरट्यांनी आस्थापना विभागातील चार कॅबिन्सचे कपाटे फोडली आणि त्यामध्ये ठेवलेली सुमारे ₹ ११ लाख रुपयांची रोकड चोरून नेली.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. चोरट्यांनी प्रवेश कसा केला आणि कोणत्या मार्गाने पसार झाले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तसेच फिंगरप्रिंट एक्स्पर्ट्सनाही घटनास्थळी बोलावण्यात आले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.















Discussion about this post