पाळधी । बचत गटाची जमा केलेली रक्कम भरण्यासाठी जळगाव येथे जाणाऱ्या एकाची बॅग तीन भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास वराड गावाजवळ घडली. या बॅगेत नागरिकांकडून जमा केलेले बचत गटाचे २ लाख ३२ हजार रुपये होते. याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवन राजू मारग (रा. बारव पिंपळगाव, ह. मु. देवकरनगर, जळगाव) हे मंगळवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास वराड गावातून बचत गटाची रक्कम जमा करून ती भरण्यासाठी दुचाकीने जळगाव येथे जात होते. वराड येथील गावाच्या बाहेर असलेल्या शाळेजवळ तीन चोरटे स्पोर्ट बाइकवर आले. त्यांनी पवन यांना धक्का देऊन खाली पाडून दगडाने मारून गाडीला लावलेली पैशांची बॅग हिसकावून धूम ठोकली.
या बॅगेत बचत गटाचे एकूण २ लाख ३२ हजार रुपये होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाळधी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरात सर्वत्र चोरट्यांचा शोध घेतला; मात्र चोरटे मिळून आले नाही. याप्रकरणी पवन मारग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाळधी दूरक्षेत्र पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सचिन शिरसाठ करीत आहे.















Discussion about this post