जळगाव । आईला घेऊन दुचाकीने घराकडे निघालेल्या महिलेच्या गळ्यातून मागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी मंगळपोत ओढून नेल्याची घटना जळगाव शहरातील काशिनाथ चौफुलीजवळील पेट्रोलपंपानजीक घडली होती. महिलेने वेळीच पोलिस ठाणे गाठून चोरट्यांचे वाहनाचे वर्णन सांगितले. पोलिसांनी रात्रभर तांबापुरा पिंजून काढून चोरटयांनी पकडले.
मुंबई येथील खुशी प्रवीण महाजन या सुप्रीम कॉलनीतील माहेरी आल्या आहेत. सोमवारी रात्री ९.३० वाजता त्या आई लताबाई यांना सोबत घेऊन दुचाकीन अजिंठा चौफुलीकडून घराकडे निघाल्या होत्या. काशिनाथ चौफुलीजवळून जात असताना मागून भरधाव दुचाकीवरील मागे बसलेल्या चोरट्याने खुशी यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची मंगळपोत हिसकावून पोबारा केला.
खुशी यांनी लागलीच एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून हकिगत पोलिसांना सांगितली, तसेच चोरट्यांच्या वाहनाचे वर्णन सांगून ते तांबापुराकडे पसार झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी लागलीच तांबापुरा भागात जाऊन चोरट्यांचा तपास सुरू केला. सहा तास तांबापुरा पिंजून काढल्यानंतर दोन्ही चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, तौन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Discussion about this post