जळगाव । गेल्या काही वर्षांपासून केळी तसेच फळपीक उत्पादकांसाठी शासनातर्फे केळी फळपीक विमा योजनेचा लाभ प्रतिकूल हवामान, वादळ, वारे, गारपीट यांसाठी दिला जातो. मात्र या २०२४-२०२५ वर्षाच्या निकषांमध्ये २० गुंठ्यांपेक्षा कमी असलेल्या अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना या पिक विमा लाभांपासून वगळले आहे.
त्यामुळे हजारो अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये शासनाविषयी मोठ्या प्रमाणावर रोष असून, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी असलेल्या जमिनीपेक्षा जास्त जमिनी कोठून आणाव्यात? हा प्रश्न उभा राहिला आहे. खरे पाहता पिक विमा कंपनी प्रति गुंठा ८५ रुपये विमा रक्कम आकारत असून मदत देताना ७०० रुपये प्रति गुंठा कमी जास्त प्रमाणात ती रक्कम देण्यात येते. आतापर्यंत या अत्यल्प भूधारक व अल्पभूधारक शेतकऱ्यांना हा छोटा लाभ मिळत असताना या वर्षी मात्र २० गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र वगळल्याने जिल्हाभरात हजारो शेतकरी या पिकविम्यापासून अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.
तर कोकणात मात्र याच विम्यासाठी १० गुंठे किमान जमीन धारणेची अट आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच विमा कंपनीने तातडीने लक्ष घालून २० गुंठ्याच्या आतील शेतकऱ्यांनाही फळपीक विम्याचा लाभ मिळवून द्यावा तसेच या शेतकऱ्यांना विमा काढण्यासाठी वाढीव मुदत मिळावी अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे.















Discussion about this post