जळगाव | नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून उच्च शिक्षण देण्यास दिलेले प्रोत्साहन लक्षात घेऊन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रशाळांमधील चार पदव्युत्तर व एक पदवी अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून इंग्रजी सोबतच मराठी या मातृभाषेतून शिकविले जाणार आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून विद्यापीठ प्रशाळेतील एम.एस्सी. (संगणक शास्त्र), एम.एस्सी. (भुगोल), एम.एस्सी. (गणित), एम.एङ हे चार पदव्युत्तर आणि व्यवस्थापन शास्त्र (बी.एम.एस.) हा पदवी असे एकूण पाच अभ्यासक्रम इंग्रजीसोबतच मराठीतून देखील शिकता येणार आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक भाग म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी आग्रह धरला आहे. त्यासाठी मातृभाषेतून अध्यापन सामुग्री निर्माण करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सर्व भाषाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन विकसित करण्यासोबतच भारतीय भाषा संवर्धनाची कल्पना मांडण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने देखील उच शिक्षण संस्थामध्ये त्या त्या मातृभाषेत पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (ए.आय.सी.टी) दिलेल्या माहिती नुसार ८ राज्यांमध्ये १९ अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सहा मातृभाषांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण सुरु केले. महाराष्ट्रात ६० विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण मराठीतून घेत आहेत.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी मातृभाषेतून उच्च शिक्षण दिले जावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि आग्रह धरला. त्यातूनच आता चार पदव्युत्तर आणि एक पदवी अभ्यासक्रम दुहेरी भाषामधून शिकविले जाणार आहे. या पाच अभ्यासक्रमासाठी त्या त्या प्रशाळांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या एकूण जागांच्या २०% जागा मराठी माध्यमासाठी व उर्वरीत ८०% जागा इंग्रजी माध्यमांसाठी राखीव आहे. दुहेरी भाषेत अभ्यासक्रम शिकविला जाणार असल्यामुळे शिक्षकांवर अतिरीक्त ताण (वर्कलोड) पडणार नाही. मराठी माध्यमासाठी जागा रीक्त राहिल्यास त्या इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील. मराठीत अभ्यास साहित्य ऑनलाईन उपलब्ध असल्यास ते विद्यार्थ्यांना सामाईक केले जाईल. पदव्युत्तर आणि पदवी अभ्यासक्रमासाठी टप्प्या टप्प्याने मराठी भाषेतील अभ्यास सामग्री तयार करण्यासाठी पावले उचलली जातील. सुरुवातीच्या काळात पावर पाँईंट प्रेझेंटेशन द्वारे दुहेरी भाषेत शिकविले जाईल. नवीन शैक्षणिक धोरणात शिफारस केल्यानुसार मातृभाषेतन दर्जेदार शिक्षण देतांना ज्या विषयांची पाठ्यपुस्तके मातृभाषेत उपलब्ध नाहीत अशा विषयांसाठी पाठ्यपुस्तकांचे अभ्यास साहित्य स्थानिक भाषेत लिहून घेतले जाणार आहे अथवा भाषांतर केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना दोन्ही भाषेत प्रश्नपत्रिका उपलब्ध केली जाईल.दुहेरी भाषा कोषातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांन प्रदान केल्या जाणाऱ्या पदवी मध्ये भाषा माध्यमाचा उल्लेख केला जाणार आहे.
इंग्रजी शिक्षणामुळे शिक्षणात मोठी दरी निर्माण झालेली असून छोट्या शहरांमधून इतर माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांसोबत बराच संघर्ष करावा लागतो. त्यामुळे देखील समाजाच्या विविध गटामध्ये वर्ग विभाजनाचे नवीन स्वरूप निर्माण झालेले दिसून येते. ही दरी भरून काढण्यासाठी भारतात प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण सुरु करणे हा उत्तम मार्ग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्व भौगोलिक स्थानातील आणि जीवनाच्या पैलूमधून विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रादेशिक भाषेतून उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने हा एक पुढाकार घेतला आहे. विद्यापीठाने या दुहेरी भाषेच्या शिक्षणा संदर्भातील मार्गदर्शक तत्वे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या संदर्भात प्रा. सतीष कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. डी.एच. मोरे, प्रा.एस.आर. थोरात, प्रा. मधुलिका सोनवणे, प्रा.एस. आर. चौधरी व प्रा.जे.बी. नाईक सदस्य असलेल्या समितीने ही मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत.
Discussion about this post