देशातील तरुणांना उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि रोजगाराच्या संधी वाढाव्यात यासाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या पीएम इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. या टप्प्यात देशभरातील तरुणांसाठी तब्बल ३१,४८० पेक्षा अधिक इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या योजनेच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान, बँकिंग व वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, रिटेल, ऑटोमोबाईल, औषधनिर्माण, उत्पादन, मीडिया, शिक्षण, पर्यटन आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळाल्याने तरुणांच्या करिअरला दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांचा कालावधी पूर्ण करावा लागणार असून दरमहा सुमारे ९,००० रुपयांचे विद्यावेतन दिले जाणार आहे. तसेच इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर अधिकृत प्रमाणपत्रही दिले जाणार आहे, ज्याचा भविष्यात नोकरी मिळवताना मोठा फायदा होऊ शकतो.
कोण अर्ज करू शकतो?
या योजनेसाठी १८ ते २५ वयोगटातील भारतीय नागरिक अर्ज करू शकतात. किमान १०वी, १२वी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर उमेदवार पात्र आहेत. सध्या शिक्षण घेत असलेले तसेच ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण घेणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात.
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून करण्यात आले आहे.















Discussion about this post