बुलढाणा । गेला काही दिवसापूर्वी राज्याला चटका लावणारी धक्कदायक घटना घडली होती. खासगी बसचा अपघात होऊन यात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर घडली होती. अनेकांनी तर या अपघाताबाबत संशयही व्यक्त केला होता.पण या अपघाताचे खरे कारण आता समोर आले आहे.
बुलढाणा बस अपघातात बसचा चालक दारूच्या नशेत होता. चालकाच्या रक्ताच्या नमुन्याच्या अहवालात चालक दारूच्या नशेत असल्याचे समोर आले आहे. रक्तामध्ये अल्कोहोल असल्याचा पुरावा आढळला आहे. या खुलाशाने एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. 1 जुलै रोजी समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या बसला अपघात झाला होता.
दुसरीकडे मुंबईची संस्था फॉरेन्सिक फायर अँड सायबर इन्वेस्टिगेटर्स हिने देखील या अपघाताचा तपास केला असून त्यांचा अहवाल बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. अपघाताच्या आधीपासूनच वाहतुकीचे नियम मोडत ही बस धावत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
आगीच्या ठिकाणी गोळा केलेल्या पुराव्यांवरून अहवालात एक सिद्धांत मांडला गेला की धडकेमुळे समोरचा एक्सल बसमधून अलग झाला आणि डिझेल टाकीला धडकला. या धडकेने टाकीचा चुराडा झाला आणि आतील डिझेल आजूबाजूच्या परिसरात पसरले. अपघाताच्या वेळी टाकीमध्ये अंदाजे 350 लिटर डिझेल होते. टाकीमधील डिझेल इंधनाच्या अचानक कॉम्प्रेशनमुळे दबाव वाढला. यामुळे टाकी त्याच्या विरुद्ध टोकाला फुटली, त्यामुळे डिझेल सांडले आणि वेगाने पसरले. डिझेल गरम एक्झॉस्टच्या संपर्कात आले, ज्यामुळे आग लागली.
Discussion about this post