मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्तेत असलेल्या महायुतीसह महाविकास आघाडीने कंबर कसली असून सध्या सर्वच पक्षांकडून जागावाटप, मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. दरम्यान, लोकसभानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकासाआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच आता महाविकासआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
कोणाला मिळणार किती जागा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकासआघाडीत सध्या जागा वाटपाबद्दल सातत्याने चर्चा होत आहे. यानुसार काँग्रेसने १०० ते १०५ जागांवर लढण्याची तयारी केली आहे. तर शरद पवार गटाने ८५ ते ९० लढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासोबतच ठाकरे गटाने ९५ ते १०० जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवानंतर महाविकासाआघाडीच्या अनेक बैठका होताना दिसणार आहे. या सर्व बैठका पितृपक्षात होतील. त्यानंतर नवरात्रीपूर्वी किंवा नवरात्रीदरम्यान जागावाटपाबद्दल अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.
त्यासोबत काँग्रेस आणि ठाकरे गटात मुख्यमंत्रिपदावरुन सध्या रस्सीखेच सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते मुख्यमंत्रिपदाबद्दल विविध विधाने करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटानेही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हे लवकर जाहीर करावा असे सांगत आहेत. त्यामुळे याच बैठकांमध्ये मुख्यमंत्रीपदाबद्दलही अंतिम निर्णय घेतला जाईल, असे बोलले जात आहे.
पवार गटाचा लोकसभेचा फॉर्म्युला कायम
लोकसभेत पवार गटाने १० जागांवर निवडणूक लढली होती. यातील ८ जागांवर त्यांना विजय मिळाला होता. त्यानुसार येत्या विधानसभा निवडणुकीतही पवार गटाचा हाच फॉर्म्युला कायम राहणार असल्याचे बोललं जात आहे. शरद पवार येत्या विधानसभेला नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत पवार गटाचे ५० हून अधिक आमदार जिंकून येऊन शकतात, असे बोललं जात आहे. तर ठाकरे गटाला साधारण 30 ते 35 जागा मिळू शकतात अशी माहिती एका सर्व्हेतून समोर आली होती.
Discussion about this post