सोनवद येथे ‘छ. शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ : पालकमंत्र्यांच्या हस्ते हजारो शासकीय सेवांचे प्रत्यक्ष वाटप
जळगाव |शासनाचा खरा अर्थ म्हणजे लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे होय. एखाद्या शेतकऱ्याची जमीनविषयक अडचण दूर झाली, एखाद्या विद्यार्थ्याला आवश्यक दाखला मिळाला किंवा एखाद्या कुटुंबाला घरकुलाचा लाभ मिळाला, तर त्या लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधानच या शिबिराचे खरे यश आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव तालुक्यातील सोनवद बु. येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’च्या प्रसंगी ते बोलत होते. या महसूल समाधान शिबिरामुळे शासनाच्या सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी शेतकरी हितासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचाही त्यांनी उल्लेख केला. सरकारने दिलेला शब्द पाळत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात आली असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. शासन शेतकरी, गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध असून अधिकाऱ्यांनी लोकांशी संवेदनशीलतेने वागून शासनाच्या योजना प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, पूर्वी नागरिकांना साध्या कागदपत्रांसाठीही विविध कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय होत होता. या पार्श्वभूमीवर शासनाने प्रशासन थेट गावपातळीवर आणण्याचा निर्णय घेतला असून “शासन जनतेच्या दारी” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या एकाच ठिकाणी सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या काही वर्षांत या अभियानामुळे हजारो नागरिकांना सातबारा, उत्पन्न दाखले, सामाजिक सुरक्षा योजना तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे. जोपर्यंत तळागाळातील शेवटच्या पात्र घटकापर्यंत योजना पोहोचत नाहीत, तोपर्यंत हे अभियान सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू असलेल्या ‘महसूल समाधान शिबिरा’चा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला. या शिबिरात महसूल, कृषी, पंचायत समिती, आरोग्य तसेच विविध विभागांच्या माध्यमातून नागरिकांच्या अर्जांवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, शासनाच्या विविध योजना आणि सेवा नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. महसूल समाधान शिबिरांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अडचणी तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनी या शिबिरांचा अधिकाधिक लाभ घ्यावा तसेच प्रशासनाशी थेट संवाद साधून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन प्रशासकीय अडचणी तातडीने सोडविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत धरणगाव तालुक्यातील सोनवद मंडळात प्राथमिक आरोग्य केंद्र, सोनवद बु. येथे शनिवारी (दि. ७ मार्च) सकाळी ९ वाजेपासून भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचे लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले.
या शिबिरात मोठ्या प्रमाणावर विविध प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. त्यामध्ये जात प्रमाणपत्र – १४४, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र – ११८, नवीन रेशन कार्ड – २७, संजय गांधी योजना मंजूर प्रकरणे – २८, वारस फेरफार – ४२, कालबाह्य नोंदी कमी करणे – ६३०, आयुष्मान भारत कार्ड – ९, घरकुल लाभार्थी नमुना ८ – १८ अशा विविध सेवा देण्यात आल्या. तसेच कृषी विभागामार्फत कांदा चाळ पूर्वसंमती – २, पॅक हाऊस पूर्वसंमती – १, शेततळे पूर्वसंमती – १ मंजूर करण्यात आले. भूमी अभिलेख विभागामार्फत ८ गावांतील एकूण २८४० ड्रोन सर्वे सनदांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पाटीलसर यांनी केले, तर तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकातून या अभियानामागील उद्देश स्पष्ट केला. या उपक्रमामुळे शेतकरी, महिला, दिव्यांग तसेच समाजातील दुर्बल घटकांना थेट प्रशासनाकडून न्याय मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपविभागीय अधिकारी (एरंडोल) मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, संदीप मोरे, मंडळ अधिकारी मोहन महाजन, हेमंत महाजन, आरिफ शेख, राकेश पवार, किरण तायडे, प्रकाश जामोदकर, दीपक पाटील, तालुका कृषी अधिकारी देसाई, वाघ, उपअधीक्षक भूमी अभिलेख श्रीमती रेखा तायडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी यांच्यासह सोनवद बु.च्या सरपंच उज्ज्वला पाटील, प्रेमराज पाटील, दिलीप अण्णा धनगर, निर्दोष पवार, चंद्रशेखर भाटिया, दामू पाटील, रवींद्र हरणे (पो.पा.) यांच्यासह अनेक पदाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, लाभार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














Discussion about this post