धुळे । धुळ्याच्या शिरपूरमध्ये २८ वर्षीय नराधमाने आठ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला असून या घटनेच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज संघटनांनी एकत्र येत शिरपूर तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. हाताला काळ्या फिती बांधून निषेधाचे फलक हातात घेत हा निषेध मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चाला हिंसक वळण आले आहे. मोर्चादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याच्या शिरपूरमध्ये आदिवासी संघटनांच्या सुरू असलेल्या मोर्चाला हिंसक वळण आले आहे. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या संतप्त मोर्चेकरांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. लाठीचारदरम्यान पोलीस अधिकारी जयपाल हिरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
झालेल्या हल्ल्यामुळे जयपाल हिरे गंभीररित्या जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. याच दरम्यान काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत.या निषेध मोर्चाला शिरपूरचे आमदार काशीराम पावरा देखील हाताला काळ्या फिती बांधून सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर शासन करण्यात यावे. त्याचसोबत हा खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशी मागणी आंदोलकांतर्फे करण्यात आली आहे.















Discussion about this post