पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. सागर बर्वे (३४) असे अटक केलेल्याचे नाव असून आरोपीला न्यायालयानं 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोण आहे धमकी देणारा
फेसबुक आणि ट्विटरवर शरद पवार यांनी धमकी मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे तातडीने पोलीस आयुक्तांना भेटल्या होत्या. त्यांनी पोलीस आयुक्तांना भेटून या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. उपमुख्यमंत्री अन् गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना त्वरीत कारवाईचे आदेश दिले होते.
आता शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी पुणे शहरातून सागर बर्वे (३४) याला अटक करण्यात आली. त्यानेच दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांना ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या फेसबुक पेजवरुन ‘तुमचा लवकरच दाभोलकर करू’ अशी धमकी दिली होती. पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यानंतर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाचे फेसबुक पेज पुण्यातील इंजिनिअर सागर बर्वे चालवत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला अटक केली. सागर बर्वे हा आयटी इंजिनिअर आहे. याप्रकरणी आरोपीला न्यायालयानं 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.