मुंबई । राज्यातील एसटी महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा देत शासनाने वेतनवाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी १०० कोटी रुपयांची तातडीची तरतूद केली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत हा थकीत हप्ता कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
सरनाईक यांनी सांगितले की, एसटी महामंडळाकडे निधीअभावी थकीत रक्कम देणे शक्य नव्हते. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून शासनाकडून दरमहा सुमारे ६५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार डिसेंबरपासून थकीत हप्त्यांचे वितरण सुरू झाले.
मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारीच्या वेतनासोबत हप्ता देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाला नव्हता. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती आणि काही कामगार संघटनांनी २४ फेब्रुवारीपासून आंदोलनाचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी शासनाकडे २१० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी १०० कोटी रुपये तत्काळ वितरित करण्यात आले असून उर्वरित निधीही लवकरच उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवासात अडथळा येऊ नये, यासाठी प्रस्तावित आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन त्यांनी कामगार संघटनांना केले आहे.















Discussion about this post